सांगोला (प्रतिनिधी) :- सध्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे, त्यांच्या शेतीचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई शासनाकडून त्वरित मिळावी, या मागणीचे निवेदन व झालेल्या नुकसानीचा आढावा देवून नुकतेच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले आ.रवींद्र धंगेकर यांचा खा.शरद पवार यांच्या हस्ते अखिल भारतीय लोणारी समाजाच्या वतीने होणार्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली.
अलीकडच्या काळात संपूर्ण राज्यातील विशेषत: सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे तेल्या रोग व मर रोगामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून हे नुकसान लक्षात घेता मेडशिंगी (ता.सांगोला) येथे अजयसिंह इंगवले यांनी “जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक” या संस्थेमार्फत माती, पाणी, देठ, पान व फूल परीक्षण रिसर्च सेंटरची उभारणी केली आहे. या रिसर्च सेंटरचे उदघाटन खा.शरद पवार यांच्या शुभहस्ते करण्याबाबतीतही सविस्तर चर्चा झाली. तसेच सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांच्या अमृत महोत्सवानिमित्त खा.शरद पवार यांच्या शुभहस्ते त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमंत्रण स्विकारण्याबाबतही सकारात्मक व सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

