डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान

0
नवी मुंबई दि. १६- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा जंगी सोहळा पार पडला. एखाद्या शासकीय सोहळ्याचा इतका मोठा इव्हेंट करण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
       केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, निरूपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोहळ्याला हजेरी लावली.
'जय जय महाराष्ट्र माझा', या महाराष्ट्र गीताने सोहळ्याला सुरुवात झाली.
सोहळ्यात प्रथम डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व 25 लाख रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, हा माझा नव्हे तर माझ्या कार्याचा, माझ्या कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचा गौरव आहे. 1943 पासून प्रथम खेड्यांमधून मी समाजकार्याला सुरूवात केली. खेड्यातील बहुसंख्य लोक हे अंधश्रद्धा, जुन्या चालीरितीने ग्रासलेले आहेत. त्यांना चांगले वळण लागायला हवे. त्यांची वागणूक सुधारावी, ही माझी भावना होती.
अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, जगात माणुसकी धर्म हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे श्वासात श्वास असेपर्यंत मी हे कार्य चालू ठेवणार आहे. माझा हा पुरस्कार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या चरणी समर्पीत आहे. त्यांच्या प्रेरणेतून समाजकार्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.
उपस्थितांना संबोधित करताना अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आवाहन केले की, या पावसाळ्यात प्रत्येकाने किमान 5 रोपे तरी लावलीच पाहीजे. तसेच, नंतर वृक्षांची निगाही राखली पाहीजे. प्रत्येकाने हा संकल्प या पावसाळ्यात केला पाहीजे. तसेच, आपल्या प्रतिष्ठानतर्फे चालवण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर तसेच इतर शिबिरांविषयीही माहिती दिली.
या सोहळ्यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून हजारो श्रीसदस्य  उपस्थित होते.
सोहळ्यासाठी खारघर येथील मैदानावर अप्पासाहेबांच्या 5 लाखांहून अधिक श्रीसदस्यांनी हजेरी लावली आहे. 
 गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सरकारी व भाजप - शिवसेनेची यंत्रणा हा सोहळा ‘ना भूतो न भविष्यति’ करण्यासाठी झटले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)