शालेय पोषण आहाराची गुणवत्ता उत्तम असणे आवश्यक - अध्यक्ष महेश ढवळे

0
             सोलापूर (प्रतिनिधी)  - विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराची गुणवत्ता उत्तम असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. ते सोलापूर जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण, शालेय पोषण आहार संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते. 
         राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यानिमित्त त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण, एकात्मिक बालविकास विभाग, शालेय पोषण आहार तसेच या संबंधित विभागांच्या अधिकारी, तसेच शालेय पोषण आहार ठेकेदार, मदतनीस यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. या बैठकांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास व जिल्हा संघटक दीपक इरकल, मोहोळ तालुका संघटक राजन घाडगे, प्रशांत महामुनी, शालेय पोषण विभागाचे लेखाधिकारी वैभव राऊत, अधिक्षक  जमादार तसेच विविध अधिकारी उपस्थित होते. 
           यावेळी बोलताना भारतामध्ये कुपोषणाच्या समस्येवर उपाय म्हणून शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार योजना सुरू करण्यात आली आहे. सकस आहार नियमित मिळावा या उदात्त हेतूने भारत सरकारने माध्यान्ह भोजन योजना सुरू केली. त्यामुळे शालेय पोषण आहाराची गुणवत्ता उत्तमच असली पाहिजे.त्यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही सांगितले. जिल्हा परिषद, नगरपरिषदा, महापालिका तसेच खाजगी शाळांमार्फत संचलित सर्व शाळांमध्ये वितरित केले जाणारे माध्यान्ह भोजन बनवताना, स्वच्छता व गुणवत्ता यांना प्राधान्य दिले पाहिजे. शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी मिळणारे साहित्य दर्जेदार असेल तरच स्वीकारावे. शासनाचे निर्देशाप्रमाणे सर्व साहित्य वापरले गेले पाहिजे. पूरक आहार विद्यार्थ्यांना आवडेल असाच असला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. मदतनीसांची आरोग्य तपासणी नियमित व्हावी. तसेच त्यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय काढले जातील असेही शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले, शाळेतील खिचडी व सांबार याची प्रत्यक्ष  चवही घेतली, तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)