राजू खरे करणार मोहोळमध्ये सत्तापालट....
           पंढरपूर (प्रतिनिधी) - 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तसेच या मतदारसंघात आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ही जागा होती.  मात्र चालू वर्षी स्थिती पूर्णपणे वेगळी बनली आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या भूकंपाचा फटका या मतदारसंघातही जाणवत आहे. शरद पवार गट व अजित पवार गट असे राष्ट्रवादीची पक्षातच मोठी फूट झाल्यामुळे मोहोळ मतदार संघात त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
       आजवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेला हा मतदारसंघ यंदा मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जातो की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
           शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या पक्षाच्या जागा वाटपाच्या वेळी नक्की ही जागा कुणाच्या वाट्याला जाईल हे सांगता येत नसले तरी शिंदे गटाच्या राजू खरे यांनी या मतदारसंघावर आपली दावेदारी सांगत या मतदासंघात विकास कामाला सुरुवात केली.
          गेली ५ ते ६ महिन्यांपासून अनेकांना सामाजिक कार्यात तसेच आर्थिक स्वरूपाच्या मदतीमुळे त्यांचे नाव संपूर्ण सोलापुर जिल्ह्यात चर्चेत असल्याने त्यांना या भागातून शिंदे गटाची उमेदवारी मिळेल असे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आजवर प्रस्थापित म्हणून ओळख असलेल्या अनेक मातब्बर नेत्यांना यामुळे धक्का सहन करावा लागणार आहे.
       "जे का रंजंले गांजले त्यासी म्हणे जो आपुले..." या संतांच्या ऊक्तीप्रमाणे राजू खरे यांची कार्य पद्धत पाहवयास मिळत आहे. संपूर्ण मोहोळ मतदार संघातील गरजवंत, वंचित  अशा सर्वसामान्य नागरिकांना सढळ हाताने मदत करीत आहेत. नागरीकांच्या विविध समस्या बाबत जातानी ते वाड्यावस्त्यावर जाऊन आरोग्य, रस्ते, कौटुंबिक समस्या तसेच मतदार संघातील सामान्य कार्यकर्ते यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी तन, मन, धन स्वरूपात जमेल तशी मदत करत आहेत.
          यामुळे मतदार संघातील सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या माध्यमातुन  होणार्या  कार्याची प्रशंसा करीत आहेत. मोहोळ मतदारसंघात राजू खरे यांच्या सुरू असलेल्या कार्यामुळे मोहोळमध्ये सत्तापालट होणार की काय? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

