मानाच्या दहा पालख्यांतील भाविकांना '१०८' च्या १०० रुग्णवाहिका देणार सेवा

0
भाविकांच्या वैद्यकीय मदतीसाठी खास अँप ची निर्मिती

        पंढरपूर (दि.19) :- आषाढीवारी साठी  पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी शासनाचा १०८ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग व राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे यंदा वारीसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उभारली आहे. यावर्षी प्रथमच १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. काही रुग्णवाहिका कार्डियाक (हृदयविकार ग्रस्तांसाठी) सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे. 

        यंदा आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व चालक सज्ज राहणार असून, त्यांच्याजवळ अत्यावश्यक औषधाचा मुबलक साठा उपलब्ध राहणार आहे देहू ते पंढरपूर (जगदगुरु संत तुकाराम महाराज), आळंदी ते पंढरपूर  (संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज), सासवड ते पंढरपूर (संत श्री सोपानकाका महाराज) आणि इतर सात मानाच्या पालख्यांबरोबर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे यांनी दिली

       तसेच  आरोग्य विभागाने यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत 'समारिटन' नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून वारकऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे. अॅपवर आलेल्या माहितीवरून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण अचूक कळणार. यामुळे वारीतील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी होण्यास मदत होणार आहे. 'समारिटन' हे अॅप शासनाच्या आरोग्य विभाग आणि एसपीईआरओ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे. अॅपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ते मोफत डाउनलोड करता येते. या अॅपमुळे केवळ रुग्णवाहिकेशी संपर्कच साधता येणार नाही, तर प्राथमिक उपचाराची माहितीही यामध्ये दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वी रुग्णाला काही आवश्यक मदत दिली जाऊ शकते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व 108 चे मुख्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनाखली  जिल्ह्यात वारकरी -भाविकांना पालखी मार्ग, तळांवर तसेच पंढरपूर शहरात आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचेही  डॉ. काळे यांनी सांगितले.
         
         रकुमाई सभागृह पोलीस संकुल, पंढरपूर येथे 'समारिटन' मोबाईल अॅप तसेच  कार्डिओपल्मोनरी  रिसक्स‍िटेशन (सीपीआर) या बाबतचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले,  पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, पुणे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे, प्रशिक्षक डॉ. साक्षी पोटदुखे, डॉ.वैभव भिंगारे, 108 चे सहा.व्यवस्थापक सुनिल चव्हाण, दिलीप शिंदे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)