विकसित भारताचा अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे
सांगोला (प्रतिनिधी) - विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प से सिध्दी या मंत्राने मोदी सरकारचा कालखंड ओळखला जाईल. ११ वर्षाच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या उज्वल भविष्याची पायाभरणी केली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याने विकासाला गती मिळाली आहे. जेथे भाजपा सरकार सत्तेत आहे त्या ठिकाणी गरीबांचा विकास झाला आहे. सरकार म्हणजे सेवा, या हेतूने काम केले जात असल्याने सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे. विकसित भारताचा अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे यामुळे मोदी सरकारचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीला जाईल असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या कार्यकाळातील विकासाच्या दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या ११ वर्षात भारताने अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. २०१४ पूर्वी सामान्य माणूस, अधिकारी हे कसे शक्य आहे, हे शक्यच नाही, असे म्हणत असे, आता गेल्या ११ वर्षातील मोदी सरकारने केलेली कामे बघता, होय, हे शक्य आहे, हे झालेच पाहिजे, मोदी सरकार असल्यामुळे हे नक्कीच होणार, असे सामान्य माणूस मोठ्या विश्वासाने म्हणून लागला आहे. मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्दप्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. आपण जनतेला जबाबदार आहोत, हे लक्षात ठेऊन मोदी सरकारने कारभार केला आहे. सरकारी कारभारात पारदर्शकता आणून, वेगवेगळ्या सुधारणा करून मोदी सरकारने आपल्या नव्या संस्कृतिचा परिचय दिला आहे. २०१४ पूर्वी देश भ्रष्टाचाराने पोखरला होता. देशात अनेक घोटाळे घडत होते. देशात लांगुलचालनाचे राजकारण सुरू होते. मोदी सरकारने मात्र देशात विकासाचे युग सुरू केले
सरकारने डीबीटी प्रणालीचा वापर करत सामान्य माणसाच्या थेट बँक खात्यात लाभ पोहचवण्याचे काम केले आहे. सामान्य माणसाला वैद्यकीय उपचारावर केल्या जाणाऱ्या खर्चाची भिती वाटत असे. मोदी सरकारने ५ लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध केले आहेत. मेक इन इंडियामुळे अनेक वस्तू आणि सेवांची निर्यात करत आहोत. आता आपण जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे.
गेल्या ११ वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेनुसार राज्य कारभार होत असल्यामुळे प्रत्येक नागरिक याचा साक्षीदार ठरला आहे. भारताच्या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे घेतले नसून १४० कोटी भारतीयांना याचे श्रेय दिले आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे सुरक्षित भारत, समृध्द भारत या मंत्राचा परिचय जगाला झाला आहे. भारतावर दहशतवादी मार्गाने हल्ला चढविला तर, दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल, हे ऑपरेशन सिंदूरमुळे जगाला कळले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतात बनवलेल्या शस्त्रास्त्रांनी, क्षेपणास्त्रांनी मोठी कामगिरी बजावली आहे. भारतात तयार केलेल्या शस्त्रास्त्रांची पाकिस्तानात यशस्वी चाचणी झाल्यामुळे भारतात बनवलेल्या संरक्षण उत्पादनांची विश्वासार्हता जगात तयार झाली आहे.

