श्रीक्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे आयोजन

0
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे ६० कीर्तनकार व १५० सरपंच होणार सहभागी
 
              पुणे  (प्रतिनिधी) - ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद’ १९ व २० जुलै २०२५ रोजी हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील ६० कीर्तनकार आणि १५० सरपंच सहभागी होणार आहेत. अशी माहिती परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, ह.भ.प. यशोधन महाराज साखरे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
        एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही गोलमेज परिषद होत आहे.
            या परिषदेचा शुभारंभ शनिवार, १९ जुलै रोजी दुपारी ३.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी राज्याचे अन्न व औषधे प्रशासन विभागाचे मंत्री श्री.नरहरी झिरवाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या सत्रात विधान परिषदेचे सदस्य श्री. श्रीकांत भारतीय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खांडबहाले डॉट कॉमचे निर्माते डॉ. सुनिल खांडबहाले हे सन्माननीय वक्ते म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 
            तसेच २० जुलै रोजी होणार्‍या वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची वाटचाल या विषयावर सकाळी ९.३० वा. होणार्‍या तृतीय सत्रामध्ये राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सामाजिक कार्यमंत्री आशिष शेलार हे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार वैभव डांगे व अभय टिळक उपस्थित राहणार आहेत.  
          "वारकरी संप्रदायाची २१व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या व आव्हाने आणि निराकरणाची संभाव्य कृतिशील उपाययोजना” हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे. परिषदेत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असलेले मौलिक लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच लोक जीवनातील विविध दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसे उपयोगी होईल. या विषयावर विविध अंगाने विचारमंथन करून सामाजिक प्रबोधनाचे नवीन विषय व कार्याची निश्चित दिशा ठरविली जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रबोधन कार्याच्या विस्ताराला सहाय्यभूत होणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. 
             उद्घाटनानंतर दोन दिवसात एकूण चार सत्रात ही परिषद संपन्न होईल. ‘२१ व्या शतकातील प्रमुख सामाजिक समस्यांचे स्वरूप व आव्हाने ’, ‘ वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल’, ‘ वारकरी संप्रदाय- २१ व्या शतकातील प्रबोधनाचे स्वरूप, समस्या व आव्हाने’ ‘ वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनातील आव्हाने व समस्या निराकरणाची संभाव्य उपाययोजना’ या विषयावर सत्रे होतील. महाराष्ट्र राज्यातून ख्यातनाम कीर्तनकार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व आदर्श सरपंच या परिषदेत आपले मौलिक स्वरूपाचे विचार व्यक्त करतील. 
              परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी सांगितले की, ‘एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मातोश्री, वारकरी सांप्रदायाच्या नि:स्सीम अनुयायी, तत्त्वदर्शी कवयित्री सौ. उर्मिलाताई कराड यांचा २० जुलै २०२५ हा तृतीय स्मृतिदिन आहे. ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.
आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शलिनी टोणपे आणि राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते. अशी माहिती जनसंपर्क विभाग, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)