विश्व हिंदू परिषदेच्या धर्मयात्रा महासंघाचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर दि. ८ (प्रतिनिधी) - विश्व हिंदू परिषदेच्या धर्मयात्रा महासंघाच्या वतीने चंद्रभागा नदी स्वच्छता अभियान पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या अभियानामध्ये श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामस्थ, तसेच पंढरपूर शहरातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अभियान अंतर्गत महाद्वार, पुंडलिक मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, दत्त घाट व संपूर्ण घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात ३५० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. विशेष म्हणजे या उपक्रमात पाच ट्रक भर कचरा उचलण्यात आला, त्यामुळे परिसरात लक्षणीय स्वच्छता साध्य झाली.
या अभियानात कोळगावचे भोसले महाराज यांचा विशेष पुढाकार लाभला. पंढरपूर येथील जिल्हामंत्री शिवाजीराव जाधव, जिल्हासहमंत्री गोपाळ सुरवसे, संतोष पापरीकर, कौस्तुभ देशपांडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे धार्मिक विभाग प्रमुख श्री. संजय मुद्राळे यांनी केले. स्वच्छतेच्या माध्यमातून चंद्रभागा नदीच्या पावित्र्याचे रक्षण आणि वारकऱ्यांसाठी सुटसुटीत, स्वच्छ परिसर निर्माण करण्याचा संकल्प यामध्ये प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आला.

