नुकसान झालेल्या सर्व पिकाचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडेअहवाल सादर करा - आ समाधान आवताडे

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकाचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना आ. समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत. दरम्यान आ.समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमनध्वनी संपर्क साधत येथील झालेल्या नुकसानीची विस्तृत माहिती देत नुकसान भरपाईची मागणी करत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची मागणी केली आहे.
           पंढरपूर-मंगळवेढा विधनासभा मतदार संघातील गावामध्ये सततच्या पावसामुळे खरिपातील पिके कांदा, उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी, तूर, व इतर सर्व पिके आणि सर्व फळबागांचे देखील सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. यावर्षीच्या माहे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस पडला असून सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झालेले आहे.
            पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यामधील ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा, उडीद, मूग, सूर्यफूल, मका, बाजरी, तूर, व इतर सर्व पिके आणि  द्राक्ष  डाळींब, आदी सर्व फळबागांचे तात्काळ पंचनामे करणेसाठीच्या सुचना  जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद यांना दिल्या आहेत. तसेच पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील महसूल व कृषी विभागाच्या  सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही तालुक्यातील नुकसानीबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
             दरम्यान मंगळवेढा येथील तहसीलदार मदन जाधव यांनी महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून हुलजंती मंडळातील पंचनामे सुरू केले असून उर्वरित मंडळातील नुकसान झालेल्या पिकांची प्राथमिक पाहणी महसूल व कृषी विभागाकडून सुरू केली आहे. दरम्यान मंगळवेढा तालुक्यात गेल्या दोन महिन्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरून न येणारे आर्थिक नुकसानीची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन आधार देण्याची मागणी केली आहे. त्यावर त्यांनी सकारत्मक निर्णय घेऊन मदतीची भूमिका सांगितली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)