राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांच्या शिष्टमंडळाने घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

0
नागरी समस्यांचा निपटारा !

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत !

             पंढरपूर (प्रतिनिधी) - शहरामध्ये अनेक नागरिक समस्या निर्माण झाल्या आहेत, अतिवृष्टीने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याकामी शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता नाही, अतिवृष्टीने बाधित शहरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी नेते अनिल सावंत, यांनी सोमवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. येथील प्रांताधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
शहरातील नागरिक आणि अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
         पंढरपूर शहरातील रस्ते पाऊस आणि दळणवळणामुळे खड्डेमय झाले आहेत. शहरात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे, येथील नागरिकांची तारांबळ उडत आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील काही झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घरादारांमध्ये पसरले होते, या घरांचे पंचनामे तत्काळ करण्याची मागणी अनिल सावंत यांनी केली. पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना या प्रश्नांची जाणीव करून दिली, याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

           पंढरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरेदारे पाण्यात असल्यामुळे, मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना त्यांना करावा लागला आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे  करावेत असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. परंतु शासन आणि येथील प्रशासन यांच्या बोलण्यामध्ये एक वाक्यता नाही, असे पंचनामे करताना जाणवले आहे, याबाबत पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याशी चर्चा करून, महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्यावयास लावण्याचे काम राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांनी केले. प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणल्याने, शहरातील नागरिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

          शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीबाबत, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचीही भेट या शिष्टमंडळाने घेतली. यावेळी अवजड वाहतुकीबाबत घोडके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंगुली निर्देश केला, आणि या शिष्टमंडळाचा मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे वळला. शहराबाहेर दिशादर्शक फलक लावण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्हाला हे काम पार पाडावे लागेल, असे या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यास ठासून सांगितले.

           याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, नागेश गंगेकर, दीपक वाडदेकर, सुरेश नेहतराव, आदित्य फत्तेपुरकर, माऊली आबा काळे, अक्षय गंगेकर, अमर सूर्यवंशी, सतीश आप्पा शिंदे, सुमित ढेबे, श्याम गोगाव,
अक्षय नवत्रे, गणेश माने, अनिता पवार, संगीता पाटील, आशा जमदाडे, गोकुळ धोत्रे, महेश अधटराव, किरणराज घाडगे, संतोष सर्वगोड यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)