पंढरपूर (प्रतिनिधी) - “संशोधन ही मानवाची आदिम प्रवृत्ती असून समाजहितासाठी त्याचा सातत्याने विकास होत आहे. निसर्गातील पानं, फळं, बिया यांच्या निरीक्षणातून लागलेली शेती ही पहिली संशोधन प्रक्रिया मानली जाते. त्याहीपूर्वी वनव्यामुळे भाजलेल्या मांसाच्या चवीतून आदिमानवाने शिजवलेल्या अन्नाचा शोध लावला. याच घटनांतून संशोधनाच्या प्रवासाची सुरुवात झाली,” असे प्रतिपादन कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी केले.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि रिसर्च डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने “कोलेब्रेटिव्ह वर्कशॉप ऑन रिसर्च इन्व्हेस्टमेंट इन अकॅडेमिया” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सुनील हेळकर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. यावेळी दहिवडी महाविद्यालय दहिवडी येथील प्राचार्य डॉ. एस एम खेत्रे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत होते.
डॉ. हेळकर पुढे म्हणाले की, “संशोधन ही जन्मजात क्षमता असून विद्यार्थ्यांना पदवी स्तरावरच योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यांच्यातून भावी शास्त्रज्ञ घडू शकतात. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासावृत्तीला चालना दिल्यास गुणवत्तापूर्ण संशोधक निर्माण होतील. निरीक्षण, माहितीचे संकलन व निष्कर्ष या प्रक्रियेवरच खऱ्या संशोधनाची पायाभरणी होते.”
अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत म्हणाले की, "रयत शिक्षण संस्था ही तळागाळातील उपेक्षित व वंचित घटकांसाठी कार्यरत असून संशोधन वृत्तीला प्राधान्य देणे, नवीन संशोधकांना प्रोत्साहन देणे व त्यांचा सन्मान करणे हे संस्थेचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. संस्थेमार्फत संशोधकांना आवश्यक सुविधा, मार्गदर्शन व मदत पुरवली जाते. प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर स्तरापर्यंत संशोधनविषयक कोर्सेस उपलब्ध करून देणारी रयत शिक्षण संस्था ही एकमेव संस्था आहे."
या कार्यशाळेत दहिवडी महाविद्यालय दहिवडी, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले.

