पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीगणपती विसर्जनाच्या मिरवणूकीने छत्रपती शिवाजी महाराज परिसर दणाणून गेला. पंढरीतील प्रत्येक मंडळाने ढोल, ताशा, लझीम तसेच विविध प्रकारच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु दर्शन मंडप चौक गणेशोत्सव तरुण मंडळाने कॉरिडोर विरोधी फलकातून भूमिका मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबाच्या भावना आता बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीतही व्यक्त झाल्या.
श्रीगणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान दर्शन मंडप चौक गणेशोत्सव तरुण मंडळाने कॉरिडॉर विरोधी फलकातून मंदिर परिसर व जुन्या परंपरा जपण्याची मागणी करत, परंपरा व श्रद्धा जपताना बाधितांचे अस्तित्व नष्ट होऊ नये अशा शब्दात आपली भूमिका मांडली.
दर्शन मंडप चौक, श्रीरुक्मिणी पटांगण, गणेश सेवा मित्र मंडळ, तांबेकर गल्ली गणेशोत्सव मंडळांने बाधितांच्या भावना किती खोलवर आहेत हे अधोरेखित केले. मंडळानी "no koridor" चे बोर्ड हातात घेऊन, श्रद्धा जपताना संसार मोडला जाऊ नये अशा स्वरूपाच्या भावना फलकातून दिसून आल्या. कॉरिडोर बाधितांच्या वर होणारे परिणाम यांचे विविध मुद्द्यांच्या आधारे सविस्तर विश्लेषण सजावटीच्या माध्यमातून करण्यात आले.
कॉरिडॉर देखाव्यासाठी दर्शन मंडप चौक तरुण मंडळाचे सर्व सभासद व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. तर विशेष परिश्रम संतोष बारसकर, ॲड. सोहम व्होरा, सतीश खंदारे, मुकुंद बडवे, श्रीराम साळुंखे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

