पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी ‘ऍश्रे’ तथा ‘अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (ए.एस.एच.आर.एइ.)’ विद्यार्थी शाखेचा स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करणे, विद्यार्थ्यांचा ऍश्रे उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवणे व तांत्रिक मार्गदर्शन करणे हे होते.
या सोहळ्यास ऍश्रे पुणे चॅप्टरचे स्टुडंट अॅक्टिव्हिटीज को-चेअर प्रा. दीपक भोगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभाग घेण्याचे व विद्यार्थी शाखा प्रभावी करण्याचे आवाहन केले. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील ऍश्रे विद्यार्थी शाखेची स्थापना दि. २६ मार्च २०१९ रोजी झाली होती. यंदा या शाखेला ६ वर्षे पूर्ण झाली असून सध्या ३५ विद्यार्थी सक्रिय सदस्य म्हणून यात कार्यरत आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी मंडळात अध्यक्षा म्हणून नुपूर अचलारे, उपाध्यक्षा म्हणून मानसी कंदी, खजिनदारपदी गौरी महाजन तर सचिव पदाचा भार कुणाल सूर्यवंशी यांनी उचलला आहे. नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी ऍश्रे शपथ घेऊन एचव्हीएसी ज्ञानाचा प्रसार, स्टेम उपक्रम आणि शाश्वत अभियांत्रिकी तत्त्वांचा प्रचार करण्याबाबतची बांधिलकी व्यक्त केली. या शपथ कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची आणि अभिमानाची भावना दृढ झाली. कार्यक्रमामध्ये एचव्हीएसी अभियंता, गणेश गुंड, एचव्हीएसी कन्सल्टिंग इंजिनिअर्स आर. एस. कुलकर्णी यांनी महत्वपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी “एनर्जी-इफिशियंट एचव्हीएसी सिस्टीम्स: पाथवे टू नेट झिरो बिल्डिंग्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानात शाश्वत उपाययोजना, उर्जा बचतीची तंत्रे व नेट झिरो इमारतींच्या दिशेने अभियंत्यांची भूमिका अधोरेखित झाली. संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचा समारोप ऍश्रे विद्यार्थी शाखेचे सल्लागार डॉ. दिग्विजय रोंगे, यांनी आभार प्रदर्शन करून केला. त्यांनी ऍश्रे पुणे अध्याय, उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सोहळा विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी व शाश्वत अभियांत्रिकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

