शासन आदेश व जिल्हाधिकारी यांचे निर्देशांचे उल्लंघन प्रकरण
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर येथे संपन्न झालेल्या आषाढी यात्रा २०२५ या कालावधीत मा. जिल्हाधिकारी साो, सोलापूर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आषाढी यात्रा काळात कोणत्याही व्यक्तीस व्ही.आय.पी. दर्शनास मज्जाव करण्यात आला असुन शासन निर्णयानुसार दर्शनासाठी समानता राहावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदी नुसार सर्व संबंधित शासकीय आधिकारी व मंदिरे समिती यांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक होते. परंतु माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत प्राप्त झालेल्या दस्ताऐवजांचे आधारे असे स्पष्टपणे निर्दशनास आले आहे की श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष व सदस्य यांनी शासन आदेश व जिल्हाधिकारी यांचे निर्देशांचे जाणीवपुर्वक उल्लंघन केले आहे. त्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अनेक व्यक्तींना बेकायदेशीररित्या श्रीविठ्ठल रुक्मीणी मातेचे थेट दर्शन (व्ही.आय.पी. दर्शन) दिले व दर्शनाच्या प्रवेशिका वितरीत केल्या होत्या.
या कृतीमुळे सामान्य गोर गरीब भाविक जे अनेकतास रांगेत उभे राहुन दर्शनासाठी प्रतिक्षा करत होते त्यांच्यावर अन्याय व भेदभाव झाला आहे. हि कृती केवळ प्रशासनिक शिस्तभंग नसुन शासन निर्णय, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच सार्वजनिक पदाचा गैरवापर या सर्वांचे गंभीर उल्लंघन आहे.
तसेच येणाऱ्या कार्तिक यात्रेच्या पार्श्वभुमीवर जर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर सदर सह अध्यक्ष व सदस्य पुन्हा आपल्या पदाचा गैर वापर करून आशा स्वरूपाची बेकायदेशीर कृती करतील याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी साहेब यांनी वैयक्तीक लक्ष घालुन तात्काळ व विना विलंब कठोर कारवाई करावी अशी सागर गोपाळ बडवे यांनी मागणी केली आहे.

