पंढरपूर (प्रतिनिधी) - "सर्वेपि सुखीनो सन्तु | सर्वे संतु निरामय: ||" या उदात्त भावनेने संपूर्ण विश्वशांतीसाठी सकल माहेश्वरी समाज पंढरपूर यांचे वतीने प्रदक्षिणा रोड येथील माहेश्वरी भवन येथे विजयादशमी पर्वकालानिमित्त नवचंडी याग संपन्न झाला.
राजस्थान जोधपूर येथील बडा रामद्वारा येथील संत रामस्नेही श्री. हरिरामजी शास्त्री महाराज यांचा चातुर्मास माहेश्वरी भवन येथे संपन्न झाला. या कालावधीमध्ये श्रीमद् भागवत कथा, रामायण कथा, अष्टोत्तर शत ब्राह्मण भोजन, कुमारिका पूजन संपन्न झाले.
याची सांगता दसरा अर्थात विजयादशमीच्या पर्वकालावर नवचंडी यागाने झाली.
श्री संतकवी श्रीधर स्वामीमहाराज यांचे विद्यमान वंशज श्री. पांडुरंगशास्त्री नाझरकर व सहकारी ब्राह्मणांच्या उपस्थितीत श्रीदुर्गा सप्तशती पाठाचे वाचन व हवन कार्यक्रम होऊन नवचंडी याग संपन्न झाला.
सध्या अतिवृष्टी व महापुरामुळे आलेल्या दुःख व संकटांपासून सर्वांची सुटका होऊन सर्वांना सुख शांती लाभावी अशी प्रार्थना करण्यात आली. यामध्ये समस्त माहेश्वरी समाज व लखेरी समाज पंढरपूर यांच्यातील सर्वांनी तन-मन-धनाने सहकार्य केले.

