पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचा धक्कादायक प्रकार
पंढरपूर (प्रतिनिधी) - पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी राज्य शासन व अनेक स्वयंसेवी संस्था आषाढी वारीत जनजागृती करत असतानाच दुसरीकडे मात्र पंढरपूर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील अनेक झाडांवर बिनदिक्कतपणे कुर्हाड चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वृक्ष प्रेमी मधून केली जात आहे.
आषाढी यात्रेसाठी विविध संतांचे पालखी सोहळे पंढरपूर जवळ आले आहेत. पालखी सोहळ्यामध्ये भाविक व नागरिकांना स्वच्छता, पर्यावरण , वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्त्व सांगण्यासाठी स्वच्छता व पर्यावरण दिंडी सहभागी झाली आहे. या दिंडीचा सांगता समारंभ 5 जुलै रोजी पंढरपूर येथील पंचायत समितीच्या आवारामध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, वनमंत्री गणेश नाईक आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची पंचायत समितीच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री व मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी भव्य असा मंडप उभारण्यात येत आहे. दरम्यान या मंडप उभारणीसाठी अडचण येऊ नये यासाठी चक्क पंचायत समितीच्या आवारातील झाडे तोडण्यात आली आहेत. स्वच्छता व पर्यावरण दिंडीच्या कार्यक्रमासाठीच अधिकाऱ्यांनी मोठं मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवल्याने पर्यावरण प्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मागील काही वर्षांमध्ये बेसुमार वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. या कामांमध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावला आहे.
वृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळ अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पालखी सोहळ्यामध्ये केले जात असतानाच शासकीय कार्यालयाच्या आवारामध्येच वृक्षांवर कुऱ्हाड चालवली गेल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. या संदर्भात नगरपालिकेचे नगर अभियंता श्री केसकर यांना विचारले असता पंचायत समितीच्या आवारातील झाडे तोडण्यासंदर्भात आम्ही कोणतीही परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

