आत्मनिर्भरतेसाठी अभियांत्रिकीचा वापर आवश्यक - व्हाईस प्रेसिडेंट, इनोव्हेशन श्रीकांत देव

0
स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

             पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘गांधीवादी अभियांत्रिकी पद्धतीचा वापर करून आपण आपल्या गावाला, देशाला, समाजाला आत्मनिर्भर बनवू शकतो. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासाचा व ज्ञानाचा वापर आत्मनिर्भर बनविण्यासाठी करावा कारण आत्मनिर्भरतेसाठी अभियांत्रिकीचा वापर करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन पुण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या इनोव्हेशन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीकांत देव यांनी केले.
        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी तर भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची १२१ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या इनोव्हेशन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीकांत देव बोलत होते. महाराष्ट्र गीत आणि स्वेरी गीतानंतर पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता म.गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
         प्रास्ताविकात स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून समाजाचे नेतृत्व करण्यात म. गांधी आणि लालबहादूर शास्त्री कसे महान होते हे सांगताना वास्तविक जीवनात त्या मूल्यांची अंमलबजावणी करताना कशी तारेवरची कसरत करावी लागते हे सांगून विचार बदलले तर सुंदर जीवनाची निर्मिती होते हे स्पष्ट केले. 'गांधीजींनी साध्या राहणीमानामुळे राष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष वेधले.’ असे त्यांनी सांगितले.
           प्रमुख पाहुणे व रिलायन्स मध्ये इनोव्हेशन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट असलेले  श्रीकांत देव पुढे म्हणाले की, ‘स्वेरीत आल्यावर मन प्रसन्न होते. चांगले संस्कार काय असतात, हे पहायला मिळते. स्वेरीच्या कॅम्पस मध्ये खूप सुंदर वाटले. कॅम्पस सुंदर करण्यासाठी डॉ. रोंगे सर आणि त्यांचे सहकारी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने परिश्रम करत आहेत. ही बाब 'परिश्रमाशिवाय शक्य नाही' हे मात्र आवर्जून पटते.’ असे सांगून त्यांनी गांधीजींच्या जीवनातील काही प्रसंगावर विचार मांडले. यावेळी त्यांनी प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशलेकर यांनी लिहीलेले ‘गांधी आणि इंजिनिअर’ हे पुस्तक सचिव डॉ. सुरज रोंगे यांना भेट स्वरुपात दिले. यावेळी क्रीडा, प्रबंध, शोध निबंध, प्रकल्प स्पर्धा या संदर्भातल्या गुणवंतांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ‘स्वेरीयन’ या  त्रैमासिकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात सौ. देव, अॅड. गणेश मिसाळ, राजू गोसावी, स्वेरी च्या माजी विद्यार्थी संघटनेचे अभिजित नवले, सौ. आरती नवले, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविकेतील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहा शिंदे, श्रावणी रोंगे व डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर डिप्लोमाच्या विद्यार्थिनी सचिवा वैष्णवी नवले यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)