बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीच्या कार्यकारिणी समितीत डॉ. धनंजय मुजुमदार यांची विभागीय कार्यवाह म्हणून निवड
वडोदरा (गुजरात) - महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी भाषिकांची राष्ट्रीय संस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली यांच्या कार्यकारिणी समितीत शेष-गुजरात विभागीय कार्यवाह म्हणून डॉ. धनंजय मुजुमदार यांची तीन वर्षांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. मध्यप्रदेशातील देवास येथे त्रैवार्षिक निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र समाज, देवास यांच्या वतीने आयोजित बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीच्या 74 व्या वार्षिक अधिवेशनात देशभरातील कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, वाराणसी, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, बेंगळुरू, राजस्थान तसेच इतर विविध शहरांमधून 350 हून अधिक सदस्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
बृहन्महाराष्ट्र मंडळ ही देशभरातील महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी भाषिकांची मध्यवर्ती संस्था आहे. 350 पेक्षा अधिक संस्था या मंडळाशी संलग्न आहेत. ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन आणि संरक्षण करण्याचे कार्य करून मराठी समाजाला एकत्रित करण्याचे कार्य करते.
डॉ. धनंजय मुजुमदार यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

