साधारण 4000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिखर समितीने मंजुरी दिली.
1 ऑगस्टपर्यंत भूसंपादन आणि बाकीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना
पंढरपूर (वृत्तसंस्था) - कॉरिडॉर आणि विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या मुंबई येथे मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार समाधान आवताडे यांच्यासह महसूल आणि जलसंपदा विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत 1 ऑगस्टपर्यंत भूसंपादन आणि बाकीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यातच पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर, आता मंजुरी देण्यात आली आहे.
पंढरपूर देवस्थान विकास आराखडा आणि कॉरिडॉरसाठी साधारण 4000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिखर समितीने मंजुरी दिली. पंढरपूरला पुढील 50 वर्षात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन पंढरपूरसाठी मंदिर परिसरात कॉरिडॉर आणि शहरात विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. जवळपास 4000 कोटींचा हा आराखडा असून याला आता मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने मंजुरी दिल्याने पंढरपुरात लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
अवघा विश्वाचा देव असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण मोठ्या संख्येने आषाढी, कार्तिकीसह पंधरवाडी एकादशीला देखील भेट देतात. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस कित्येक पटीने वाढत चाललेली आहे, गेल्या आषाढी एकादशीला तब्बल 28 लाख भाविक पंढरीत आल्याची नोंदणी एआय तंत्रज्ञानाने केल्याचं समोर आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर परिसराचा विस्तार आणि विकासाच्या दृष्टीने नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर परिसरात दुर्घटना घडू नये, येणाऱ्या भाविकांना विठ्ठलाचे सुलभ, सहज दर्शन व्हावे यासाठी हा आराखडा राबवला असून मुख्यमंत्र्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून याकडे पाहिले जात आहे.

