पंढरपुर दि. ११ - मा. जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली दि.५ जुन रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी मंदिर समितीला दिलेल्या आदेशानुसार, वारकरी संप्रदाय महाराज मंडळी व पारंपारिक आयुर्वेद वज्रलेपन तज्ज्ञ यांच्या कडून श्रीविठ्ठल मुर्तीचे परिक्षण दि.११ जुन एकादशीच्या पहाटे करण्यात आले. या पाहणीनंतर ११.३० वा. पुन्हा एकदा मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाच्या वतीने विशेष आमंत्रित पारंपरिक वज्रलेपन तज्ज्ञ श्रीआशीर्वाद ऐरानी (ललीत नंदन) तसेच श्री.विकास सावंत, इंद्रजित घोरपडे तसेच वारकरी संप्रदाय पाईक संघ व वारकरी फडकरी दिंडी समाज युवा संघ चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शासकीय पुरातत्व खात्याने श्री.विलास वाहने सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची रासायनिक लेपन प्रक्रियेची मांडणी केली. तर विशेष आमंत्रित तज्ज्ञांनी पारंपरिक वज्रलेपनाची पद्धती, त्याची हजारो वर्षांची परंपरा, या वज्रलेपनात वापरली जाणारी आर्युवेदीय वनस्पती घटक याची माहिती देऊन रासायनिक लेपन प्रक्रियेच्या ऐवजी पारंपरिक वज्रलेपनाची पद्धती अवलंबल्यास मुर्तीचे इथुन पुढे हि शेकडो वर्षे विनातक्रार जतन व संवर्धन शक्य आहे यासाठी आम्हाला पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपनासाठी परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी केली.
याच मागणीचा पुनरुच्चार व आग्रह वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आला. १९८५ पासुन शासन स्थापित मंदिर समितीने पुरातत्व खात्यामार्फत इपाॅक्सी व तत्सम प्रकारचे रासायनिक लेपन पाच ते सहा वेळेस मुर्तीं वर केले तरीही वारंवार तीच प्रकिया का करावी लागत आहे. दीर्घकालीन उपाययोजना का केली जात नाही.आणि १९८५ पुर्वी हजारो वर्षे श्रीविठ्ठल मुर्ती पारंपरिक वज्रलेपनाद्वारेच जतन केली जात होती तर आताच दुष्परिणाम असणारा रासायनिक लेपनाचा दुराग्रह पुरातत्व खात्याने का धरला आहे. पारंपरिक वज्रलेपनाची पद्धती व त्यातील घटक हे शासनमान्य संस्थेद्वारे प्रमाणीत नाहीत याचा अर्थ ते चुकीचे आहेत असा अर्थ काय होतो ? पुरातत्व खाते रासायनिक वज्रलेपन पद्धती अवलंबली तर कधीच मुर्ती खराब होणार नाही असे लेखी देऊ शकते का ? असे अनेक गंभीर प्रश्न वारकरी संप्रदायाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या समोर उपस्थित केले.
तसेच आम्ही केवळ पांडुरंगाच्या पाठींब्यावर हि लढाई लढत असून शासकिय व्यवस्थेने आमच्या श्रद्धेच्या पलिकडे जाऊन मुर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया अवलंबल्यास भाविक म्हणून आम्हाला प्रचंड वेदना होतील. तरी जिल्हाधिकारी महोदयांनी सकारात्मक योग्य निर्णय करावा.अशी भुमिका बैठकीत संप्रदायाच्या वतीने रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांनी मांडली.
मंदिर समिती सदस्य माधवी निगडे यांनी मुर्ती जतन संवर्धनाची कायमस्वरुपी मार्गदर्शक कार्यपद्धती विकसीत केली जावी हि सुचना , सदस्य प्रकाश जवंजाळ यांनी वारकरी संप्रदायाच्या भुमिकेचा संवेदनशीलपणे विचार करावा असे मत , जळगावकर महाराज यांनी मुर्तीचे स्वरुप बदलणार नाही अशी योग्य प्रक्रिया करावी अशी अपेक्षा तर सल्लागार शिवणीकर यांनी समन्वय साधून निर्णय घेण्यात यावा असा सल्ला दिला. तर सह अध्यक्ष औसेकर महाराज यांनी वारकरी संप्रदायाच्या मागण्या मौलीक असुन त्याकडे दुर्लक्ष न करता विचारपुर्वक पुरातत्व खात्याने मार्ग काढावा अशी भूमिका स्पष्ट केली.
यावर सर्वांचे मत शांतपणे ऐकून घेतले आहे सर्वांना मान्य असा निर्णय घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
या बैठकीस माननीय जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन , मंदिर समिती सह अध्यक्ष औसेकर महाराज, मंदिर समिती सदस्य , कार्यकारी अधिकारी शेळके साहेब तसेच महाराज मंडळींमध्ये सर्वश्री विठ्ठल महाराज नामदास, रघुनाथ महाराज कबीर, नागेश महाराज बागडे, मयुर महाराज बडवे, श्रीकांत महाराज टेंभूकर, बापुसाहेब महाराज उखळीकर, चंद्रशेखर महाराज ठाकुर व देविदास महाराज ढवळीकर , मंदिर महासंघ पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव तसेच उपस्थित होते.
-----------------------------------------------------------
....जर तरीही प्रशासनाने रासायनिक लेपन प्रक्रियेला रेटण्याचा प्रयत्न केला तर वारकरी संप्रदायातील जेष्ठ मंडळींशी सविस्तर चर्चा करुन याला न्यायालयात आव्हान देता येईल का याचा कायदेशीर सल्ला घेऊन पुढे जाण्याचा संप्रदायाचा मानस बैठकीनंतर व्यक्त करण्यात आला.
वारकरी संप्रदाय पाईक संघ
श्रीक्षेत्र पंढरपूर.
-----------------------------------------------------------

