कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ४ जुलै रोजी राज्य पात्रता परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

0
पहिल्याच प्रयत्नात 'सेट'मध्ये यश मिळविण्यासाठी सुवर्णसंधी

           पंढरपूर (प्रतिनिधी) - रयत शिक्षण संस्थेचे अधिकार-प्रदत्त स्वायत्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, त्याचाच एक भाग म्हणून सर्व पदव्युत्तर विभागांतील विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी राज्य पात्रता परीक्षा (सेट) पेपर क्रमांक १ व २ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील सर्व पदव्युत्तर विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी दिली.
               विद्यार्थ्यांना राज्य पात्रता परीक्षेची अभ्यासपूर्व तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून देणे, परीक्षेचे स्वरूप समजावून सांगणे तसेच अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
            या कार्यशाळेस 'राज्य पात्रता परीक्षा पेपर क्रमांक १' या पुस्तकाचे लेखक, नामवंत मार्गदर्शक व इंग्रजी विषयाचे अभ्यासक डॉ. शशिकांत शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये राज्य व राष्ट्रीय पात्रता परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
            कार्यशाळेचे आयोजन तीन सत्रांमध्ये करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात पेपर क्रमांक १ मधील विविध घटकांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन, प्रश्नोत्तर आणि परीक्षेतील यशासाठी आवश्यक अभ्यासतंत्रांवर चर्चा होईल. तिसऱ्या सत्रात संबंधित पदव्युत्तर विभागांमध्ये पेपर क्रमांक २ विषयाचे विषयनिहाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. ४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत महाविद्यालयातील रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात होणार आहे. कार्यशाळेसाठी नाममात्र सहभाग शुल्क ठेवण्यात आले असून, त्यामध्ये नावनोंदणी, भोजन व्यवस्था आणि सहभाग प्रमाणपत्राचा समावेश आहे.
             महाविद्यालयातील सर्व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या विभागप्रमुख अथवा पदव्युत्तर समन्वयकांकडे त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. गोवर्धन दिकोंडा (मो. ९०२१२०७३३६), अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. अमर कांबळे (मो. ९८८१५१४६७७) आणि पदव्युत्तर अधिष्ठाता प्रा. डॉ. बी. एस. बलवंत यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)