प्रा. सैफअली विजापुरे यांना इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान

0
थॉमस हार्डी यांच्या कादंबऱ्यांतील वर्गसंघर्षाचा चिकित्सक अभ्यास; 

         पंढरपूर (प्रतिनिधी) - रयत शिक्षण संस्थेच्या, अधिकार-प्रदत्त स्वायत्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक सैफअली विजापुरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. 'Class Conflict in Selected Novels of Thomas Hardy' हा त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता. या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रो. डॉ. संजय शिवशरण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
            प्रा. विजापुरे यांनी आपल्या संशोधनातून इंग्रजी साहित्यातील श्रेष्ठ कादंबरीकार थॉमस हार्डी यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील वर्गसंघर्ष, सामाजिक विषमता आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने मानवी जीवनातील संघर्षमूल्यांचा चिकित्सक अभ्यास केला आहे. त्यांच्या संशोधनामुळे हार्डी यांच्या साहित्यकृतींतील सामाजिक वास्तव आणि वर्गीय जाणिवांचा अभ्यास अधिक समृद्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

        प्रा. सैफअली विजापुरे हे प्रा. डॉ. फैमिदा विजापुरे यांचे चिरंजीव असून त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. धनंजय साठे, प्रा. डॉ. महादेव कोरी, प्रा. धनंजय वाघदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

         प्रा. सैफअली विजापुरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून गौरव केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)