सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा विजयाचा झेंडा.! १९ पैकी १८ जागांवर वर्चस्व

0
माळशिरसचा गड मात्र मोहिते पाटलांनी राखला !

              सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १९ पैकी तब्बल १८ जागांवर सहकार विकास पॅनलने विजय मिळवला असून, मोहिते पाटलांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
               जिल्ह्यात भाजप विरुद्ध मोहिते पाटील असा प्रतिष्ठेचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या निवडणुकीत प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह भाजपप्रणित पॅनलचे १० उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ९ जागांसाठी मतदान झाले आणि आज झालेल्या मतमोजणीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले.
             माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले. त्यामुळे भाजपच्या विजयाच्या लाटेतही मोहिते पाटील गटाने आपला बालेकिल्ला कायम राखला.
या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची लढत बँक आणि पतसंस्था मतदारसंघातून पाहायला मिळाली. भाजपप्रणित पॅनलचे मनीष देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे यांचा २८ मतांनी पराभव केला.
           भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार :-
राजेंद्र राऊत – बार्शी विकास सोसायटी
प्रशांत परिचारक – पंढरपूर विकास सोसायटी
विक्रांत (बाळराजे) पाटील – मोहोळ विकास सोसायटी
सिद्धेश्वर आवताडे – मंगळवेढा विकास सोसायटी
यशराज शिंदे – माढा विकास सोसायटी
श्रीदीप हसापुरे – दक्षिण सोलापूर विकास सोसायटी
पृथ्वीराज माने – उत्तर सोलापूर विकास सोसायटी
शंभूराजे जगताप – करमाळा विकास सोसायटी
सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट विकास सोसायटी
अजिंक्यराणा पाटील – ओबीसी मतदारसंघ
मतमोजणीत विजयी झालेले भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे उमेदवार :
बाबासाहेब देशमुख – सांगोला विकास सोसायटी
अर्चना घाडगे – महिला
शामल बागल – महिला
राजेंद्र बंदीछोडे – इतर भटक्या जमाती
रणजितसिंह शिंदे – कृषी व प्रक्रिया
मनीष देशमुख – बँक व पतसंस्था
सूर्यादित्य साळुंखे – दुग्ध विकास
महादेव कांबळे – अनुसूचित जाती
           स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार - अर्जुनसिंह मोहिते पाटील – माळशिरस विकास सोसायटी.
           एकूणच, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने मोठा विजय मिळवत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)