कर्मयोगी विद्यानिकेतन येथे ‘स्वतःच्या सहीने बँक खाते’ उपक्रमाचा प्रारंभ
पंढरपूर (प्रतिनिधी) - दहा वर्षे व त्यावरील विद्यार्थ्यांना स्वतःच्या सहीने बँक खाते उघडता यावे, तसेच त्यांच्यात बचतीची सवय, आर्थिक शिस्त आणि बँकिंग व्यवहारांचे प्राथमिक ज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा प्रारंभ कर्मयोगी विद्यानिकेतन येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, संचालक अनिल अभंगराव, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, कर्मयोगी संकुलाचे रजिस्ट्रार गणेश वाळके आणि कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे पदाधिकारी, शैक्षणिक संकुलातील मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले. शालेय शिक्षणातून विविध विषयांचे ज्ञान मिळते; मात्र दैनंदिन जीवनासाठी आवश्यक व्यवहारज्ञानही विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. पैशांचे नियोजन, बचत, आर्थिक व्यवहारांची समज आणि पैशांचा योग्य वापर यांची सवय लहान वयात लागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्वतःच्या सहीने खाते उघडण्याची संधी देणारे हे अभियान शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंग व्यवहारांची ओळख होऊन आर्थिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल. खाऊच्या पैशांतून किंवा अन्य माध्यमांतून नियमित बचत करण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी. आजची छोटी बचत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे सरदेसाई यांनी नमूद केले.
याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे म्हणाले की “छोटी बचत ही भविष्यातील स्वप्नांची नांदी आहे,” असे त्यांनी सांगितले. नियमितपणे केलेली बचत कालांतराने मोठ्या आर्थिक आधारात रूपांतरित होऊ शकते. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात छोट्या पावलाने होते; त्याचप्रमाणे बचतीची सुरुवात विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करू शकते.
बँक खाते हे केवळ पैसे जमा करण्याचे साधन नसून आर्थिक शिस्त, जबाबदारी आणि स्वावलंबन शिकण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नावाने खाते उघडून नियमित बचत करावी आणि आर्थिक व्यवहारांची माहिती करून घ्यावी. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये बँकिंगविषयक जागरूकता निर्माण व्हावी आणि आधुनिक बँकिंग व्यवस्थेची ओळख व्हावी, या उद्देशाने अभियान सुरू करण्यात आल्याचे मत उमेश विरधे यांनी व्यक्त केले.
बँकेचे चेअरमन सतीश मुळे म्हणाले की- कुटुंबप्रमुख प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर अर्बन बँक सातत्याने प्रगती करीत आहे. ग्राहकाभिमुख सेवा, आर्थिक शिस्त आणि समाजातील विविध घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविणे यांना बँकेने प्राधान्य दिले आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक आणि बँकेचे भावी खातेदार आहेत. लहान वयात बँकिंग व्यवहारांची माहिती मिळाल्यास त्यांच्यात आर्थिक नियोजनाची क्षमता विकसित होईल. स्वतःच्या सहीने खाते उघडण्याच्या अभियानामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची जाणीव होऊन बचतीच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचा पाया मजबूत होईल, असे मुळे यांनी सांगितले.
बँकिंग सेवा समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण करणे ही बँकेची सामाजिक बांधिलकी आहे. या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना बँकेशी जोडण्याचा आणि त्यांच्यात बचतीची सवय विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
आर्थिक साक्षरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण उपक्रम
डिजिटल व्यवहार, बचत, आर्थिक नियोजन आणि पैशांचा जबाबदार वापर यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना लहान वयात मिळणे आवश्यक आहे. पंढरपूर अर्बन बँकेचे हे अभियान विद्यार्थ्यांना बँक खाते उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित नसून त्यांना आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि जबाबदार बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नियमित बचतीची सवय विकसित होण्यास मदत होईल. तसेच आर्थिक व्यवहारांची प्राथमिक समज निर्माण होऊन भविष्यातील आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास वाढेल.
कर्मयोगी विद्यानिकेतन येथे अभियानाचा प्रारंभ करून पंढरपूर अर्बन बँकेने विद्यार्थी आणि बँकिंग क्षेत्र यांच्यातील संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पंढरपूर अर्बन बँकेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय आणि आर्थिक साक्षरता विकसित करण्यास तसेच भावी पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे मत ही याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, संचालक अनिल अभंगराव ,सी इ ओ उमेश विरधे यांचा सन्मान करण्यात आला.
सेव्हिंग खाते उघडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पीगी बँक, खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी पंढरपूर बँक सेवक व कर्मयोगी विद्यानिकेतन मधील शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले..

