नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेत ५ टन कचरा संकलित; दर बुधवारी श्रमदान अभियान राबविणार - मुख्याधिकारी महेश रोकडे

0
चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

 ‘स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर’ 
             पंढरपूर, दि. ४ (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांसह वारकरी संप्रदायातील महाराज, विद्यार्थी, स्वयंसेवक, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोहिमेदरम्यान तब्बल ५ टन कचरा संकलित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

            पंढरपूर नगरपरिषद, नगरपरिषद शाळा क्रमांक ६ व ७, वृक्षदाई ग्रुप पंढरपूर, प्राथमिक आश्रमशाळा पंढरपूर तसेच कोळगाव, घारगाव, घोटवी, कोथूळ, चिखली, अस्तगाव, वडाळी, भानगाव, आलेगाव, पडवी, पाटस, कानगाव, हिरडगाव, ढोरजा व मांदळी या पंचक्रोशीतील सेवेकऱ्यांच्या संयुक्त सहभागातून हे अभियान आयोजित करण्यात आले.
            या अभियानात ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. भागवत महाराज कबीर, ह.भ.प. ज्ञानेश्वर जोगदंड महाराज, ह.भ.प. विठ्ठल महाराज जाधव यांच्यासह विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. नगरसेवक ओंकार जोशी, विद्यार्थी आणि नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.

पाच टन कचरा संकलित; परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य
            चंद्रभागा वाळवंट परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता अभियानादरम्यान तब्बल ५ टन कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक व अन्य घनकचऱ्याचा समावेश होता. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. सामूहिक श्रमदानातून परिसरातील स्वच्छता करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

स्वच्छता हीच विठ्ठल सेवा : ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले
             "पंढरपूर हे देशभरातील लाखो वारकरी आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चंद्रभागा नदी आणि तिचा परिसर हा प्रत्येक वारकऱ्याच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या पवित्र परिसराचे पावित्र्य, स्वच्छता आणि सौंदर्य जपणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांनी स्वच्छ पंढरपूर साकार होणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणे आवश्यक आहे. स्वच्छता हीच विठ्ठल सेवा असून, अशा उपक्रमांमधून समाजात स्वच्छतेचा संस्कार रुजेल," असे मत ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी व्यक्त केले.

स्वच्छतेचा वसा प्रत्येकाने स्वीकारावा : ह.भ.प. विठ्ठल महाराज जाधव
             "वारीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो भाविक येतात. भाविकांना स्वच्छ आणि सुंदर पंढरपूरचा अनुभव मिळावा, यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे. चंद्रभागा वाळवंट स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून, ती वारकरी संप्रदायासह संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. दर बुधवारी राबविण्यात येणाऱ्या श्रमदान अभियानात सर्वांनी सहभागी होऊन स्वच्छतेचा वसा जपावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि इतरांनाही स्वच्छतेबाबत जागरूक करावे," असे आवाहन ह.भ.प. विठ्ठल महाराज जाधव यांनी केले.

दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता श्रमदान अभियान
            पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि इच्छुक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
           या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे व नागरिकांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपल्या संस्थेची नोंदणी करावी. नोंदणी व समन्वयासाठी उपमुख्याधिकारी श्री. रविंद्र सूर्यवंशी (मो. ८६६८८१४३६५) यांच्याशी संपर्क साधावा.
           पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व निर्मळ ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ‘स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  महेश रोकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)