शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, साडे तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त

0
बसस्थानकावरील चोरीचा गुन्हा उघडकीस!

महिला आरोपीकडून साडे तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त

       पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत बसस्थानकावरील सोन्याचे दागिने चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्याकडून सुमारे साडे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पंढरपूर शहर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी सीता बिभीषण आसबे (रा. शेळवे, ता. पंढरपूर) या १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मानेगाव (ता. माढा) येथे जाण्यासाठी पंढरपूर येथील नवीन बसस्थानकावर आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सुमारे ३.३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. यामध्ये गंठण, मंगळसूत्र आणि ठुशी या दागिन्यांचा समावेश होता.

            या चोरीच्या घटनेचा तपास करण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. तसेच बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित महिला रेणुका नवनाथ चव्हाण (रा. पाथर्डी, जि. बीड) हिला ताब्यात घेतले.

           पोलिसांनी तिच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता, बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली तिने दिली. त्यानंतर तिच्याकडून चोरीस गेलेले गंठण, मंगळसूत्र व ठुशी असे सोन्याचे दागिने हस्तगत करून पोलिसांनी जप्त केले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर करून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली.

         ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

          या कारवाईत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.फौ. सुजित उबाळे, पोलीस हवालदार अनिल बनसोडे, अस्लम काझी, सचिन हेंबाडे, गणेश पवार, बापुसाहेब मोरे, सुनील मोरे, पोलीस कॉन्स्टेबल हर्षद ठाकर, पोलीस शिपाई शहाजी मंडले आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक नवले यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अनिल बनसोडे करीत आहेत.

         पंढरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अल्पावधीत केलेल्या या यशस्वी तपासामुळे चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तत्पर आणि कौशल्यपूर्ण कामगिरीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)