कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा
पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयातील पाच क्रिकेटपटूंची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या क्रिकेट संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही क्रिकेट स्पर्धा गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे होणार आहे. या निवड झालेल्या खेळाडूमध्ये कर्णधार दिनेश शिंगाडे, मारुती कांबळे, प्रवीण वाघमारे, ओंकार रोकडे आणि अथर्व देशमाने यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना महाविद्यालयाच्या जिमखाना विभागामार्फत सातत्यपूर्ण सराव, मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या यशामध्ये शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले व प्रा. अनिल परमार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग तसेच सेवक वर्ग उपस्थित होते. सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, भविष्यातही खेळाडूंनी अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

