अकोट (प्रतिनिधी) : राष्ट्रसेवा परिषद व मराठ बोली संस्था, पुणे यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य साहित्य संमेलनात विदर्भातील प्रसिद्ध कवी संजय मधुकर अरबट (आकोट) यांना समाज महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे पार पडलेल्या या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात हजारो रसिकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गेल्या २० ते २५ वर्षांपासून साहित्य संमेलन, ग्रंथ मेळावे आयोजित करून साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी मा. अतिरिक्त पोलीस महासंचालक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुकाराम जाधव, तसेच शिवाजी भापकर, परमेश्वर उमरदंड, तेजस्वी आमले, निवेदिका रजनी धांडगे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुरकुटे यांनी बहारदार शैलीत केले.
कार्यक्रमात तुकाराम जाधव आणि तेजस्वी आमले यांच्या मुलाखती व मान्यवरांची समर्पक भाषणेही झाली. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ तसेच ३९ ग्रंथांचा संच असे होते.
या कार्यक्रमास साहेबराव पवळे, शरद अत्रे, प्रिया खैरे पाटील, हेमंत परब, शिवाजी उराडे, वैशाली गावंडे, श्रीपाद टेंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो साहित्यिक, रसिक व पत्रकार उपस्थित होते.
कवी संजय अरबट यांना यापूर्वीही ज्ञानेश्वर : काल आणि आज पुरस्कार, साहित्य सेवा पुरस्कार (पुणे), महाराष्ट्र प्रथम कवी पुरस्कार (मेहकर), लोकरंग पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार (अहमदनगर), वैशाख कविता पुरस्कार (नामपूर) असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांचे “तुझ्या सावल्या”, “माय”, “वैशाखवेली”, “पालवी”, “वैशाख फुलोरा” हे कवितासंग्रह प्रसिद्ध असून “म्हा आई”, “जोगवा”, “म्हाई देवीला चला” ही गीतेही प्रदर्शित झाली आहेत. विविध वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. तसेच ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांनी कविकट्ट्यावर काव्यवाचन केले आहे.
कविवर्य संजय अरबट यांना समाज महर्षी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

