शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाला बळ मिळणार
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी घेतला प्रचारात वेग
पंढरपूर (प्रतिनिधी) - पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचारात वेग घेतला आहे. शिक्षकांच्या थेट गाठीभेटी, शाळांना प्रत्यक्ष भेटी आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यावर भर देत सावंत यांनी मतदारांशी संपर्क वाढवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड परिसरातील विविध शाळांना भेटी देऊन त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि शिक्षक चळवळीप्रती असलेली बांधिलकी या मुद्यांच्या जोरावर सावंत यांनी निवडणुकीच्या मैदानात आपली दावेदारी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षकांशी संवाद साधताना माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी 'शिक्षक चळवळ टिकलीच पाहिजे' हा निर्धार व्यक्त केला.
आज शिक्षकांसमोर सेवाविषयक प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध आव्हाने उभी आहेत. या प्रश्नांची प्रभावी सोडवणूक करण्यासाठी शिक्षकांच्या अडचणींची सखोल जाण असलेला आणि त्यांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत ठामपणे आवाज उठवणारा अभ्यासू प्रतिनिधी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांचे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता त्यावर सातत्याने पाठपुरावा करणे, शिक्षकांना न्याय मिळवून देणे आणि शैक्षणिक चळवळीला अधिक बळकटी देणे, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड परिसरातील शाळांना दिलेल्या भेटीदरम्यान स्थानिक शिक्षकांनी सावंत यांचे उत्साहात स्वागत केले. शिक्षकांच्या प्रश्नांबाबतची स्पष्ट भूमिका आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची तयारी यामुळे सावंत यांच्या प्रचाराला बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ सभा आणि भाषणांवर अवलंबून न राहता प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रचार मोहिमेचे वैशिष्ट्य ठरत आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये सावंत यांच्या प्रचार यंत्रणेकडून संपर्क मोहिमे ला गती देण्यात येत आहे. दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांशी असलेली नाळ अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून, त्यांच्या प्रचारातील संपर्क मोहिमेमुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.
शिक्षकांच्या हक्कांचा लढा आणि शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून सावंत यांनी प्रचाराची दिशा निश्चित केली असून, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे.

